विभक्ती
नामे सर्वनाम यांचा क्रियापदाशी व इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
टीप : लिंग, वचन, विभक्ती मुळे नामांच्या मूळ रूपात विकार होतात.
विभक्ती प्रत्यय
नामे किंवा सर्वनामे यांचे विभक्तीत रूपांतर होताना जी अक्षरे जोडली जातात त्यास प्रत्यय असे म्हणतात.
उदा : मुलास – स, मुलाचा – चा, मुलाने – ने
सामान्यरूप
विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनाम यांच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्यरूप म्हणतात.
उदा : फुल – मूळ शब्द, फुलाचा – विभक्तीचे रूप, फुला – सामान्यरूप, चा – प्रत्यय
कारकार्थ
नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास कारकार्थ म्हणतात.
उपपदार्थ
नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी जो संबंध असतो त्यास उपपदार्थ म्हणतात.
विभक्ती | विभक्तीचे प्रत्यय | कारकार्थ | |
एकवचन | अनेकवचन | ||
प्रथमा | — | — | कर्ता |
व्दितीया | स, ला, ते | स, ला, ना, ते | कर्म |
तृतीय | ने, ए, शी | नी, शी, ई, ही | करण (साधन) |
चतुर्थी | स, ला, ते | स, ला, ना, ते | संप्रदान (दान/भेट) |
पंचमी | ऊन, हुन | ऊन, हुन | अपादान (दुरावा/वियोग) |
षष्टी | चा, ची, चे, च्या | चा, ची, चे, च्या | संबंध |
सप्तमी | त, ई, आ | त, ई, आ | अधिकरण (स्थळ/वेळ) |
संबोधन | — | नो | हाक |
टीप : कारकार्थ मध्ये षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही ते उपपदार्थ निर्माण करतात.
विभक्तीचे प्रकार
प्रथमा
जर कर्ता, कर्म व क्रियेचे स्थळ, वेळ दर्शवणाऱ्या शब्दाला प्रत्यय नसतील तर ते प्रथमा विभक्ती असते.
१) राम क्रिकेट खेळला.
२) आशिष गाय बांधतो.
व्दितीया
कर्माला स, ला, ना, ते प्रत्यय असतील व दानाचा/भेटीचा संबंध नसेल तर व्दितीया विभक्ती असते.
उदा :
१) राजाने प्रधानाला बोलावले. – कर्म (व्दितीया)
२) पोलिसाने चोरास पकडले. – कर्म (व्दितीया)
३) पोलिसाने चोर पकडला. – कर्ता (प्रथमा)
टीप : जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते प्रथमा विभक्ती असते.
कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती व्दितीय नसते.
तृतीया
क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली हे दर्शवणाऱ्या नामांना जर ने, ए, शी, नी प्रत्यय असेल तर तृतीया विभक्ती होते.
उदा :
१) मुलाने चाकूने सफरचंद कापले.
२) मी रस्त्याच्या कडेने गेलो.
३) माणसाने इतरांचा द्वेष करू नये.
चतुर्थी
जर वाक्यात स, ला, ना, ते प्रत्यय असून दान किंवा भेटीचा वर्णन होत असेल तर ते विभक्ती चतुर्थी असते.
१) दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (दान)
२) नदी सागराला भेटते. (भेट)
३) करणाने इंद्राला कवच कुंडले दिली. (दान)
पंचमी
जर वाक्य दुरावा, अंतर दर्शवत असेल आणि वाक्यात ऊन, हुन प्रत्यय असतील तर तेथे पंचमी विभक्ती होते.
उदा :
१) साप बिळातून बाहेर गेला.
२) फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते.
३) धिरज नागपूरहून आला.
षष्टी
जर वाक्यात चा, ची, चे, च्या प्रत्यय असतील आणि वाक्य संबंध दर्शवत असेल तर तेथे षष्टी विभक्ती होते.
उदा :
१) त्याचे खाऊन झाले.
२) आमचा बसचा प्रवास संपला.
३) ससा हातचा निसटला.
सप्तमी
स्थळ, वेळ, साधन दर्शवणाऱ्या शब्दांना त, ई, आ प्रत्यय जोडले असेल तर तेथे सप्तमी विभक्ती होते.
उदा :
१) मी सकाळी अभ्यास करतो.
२) माझ्या घरात सात माणसे आहेत.
३) मी शाळेत जातो.
संबोधन
ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन विभक्ती म्हणतात, सर्वनामांना हाक मारता येत नाही त्यामुळे त्याची संबोधन विभक्ती होत नाही.
उदा :
१) मुलांनो, रांगेत उभे राहा.
२) रामा, पाणी आन.
३) शाम, इकडे ये.