अलंकार
भाषेचे सौंदर्य वाढवणारे शास्त्र म्हणजे अलंकार. भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार पडतात
शब्दालंकार
अर्थालंकार
शब्दालंकार
या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते. शब्दालंकाराचे खालील प्रकार पडतात.
अनुप्रास – (अक्षराची पुनरावृत्ती)
कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा
अनुप्रास हा अलंकार होतो.
१) देवा दीनदयाळा। दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मज दे ।
२) आज गोकुळात रंग खेळतो हरी। राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी।
३) बालिश बहु बायकांत बडबडला.
यमक
वेगवेगळे अर्थ असणाऱ्या; परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठरावीक ठिकाणी
केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते, त्यास यमक असे म्हणतात.
१) सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो।
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ।।
२) मना सज्जना भक्तिपंथेची जावे।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।
श्लेष अलंकार
या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो.
१) ‘ हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. ‘ (आयुष्य/ पाणी)
२) श्रीकृष्ण नवरा मी नवरी।
शिशुपाल नवरा मी न-वरी ॥
३) कुस्करु नका ही सुमने ॥
जरि वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने ॥ (फुले/ चांगली मने)
४) मला एस.टी. लागते. (गरज असणे/ त्रास होणे)
५) शंकरास पुजिले सु-मनाने.
अर्थालंकार
या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. अर्थालंकाराचे खालील प्रकार पडतात.
(महत्त्वाचे – उपमेय: ज्याची तुलना करतात, उपमान: ज्याच्याशी तुलना करतात)
उपमा
दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस सारख्या वापर
केल्यास उपमा अलंकार होतो.
१) असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी.
२) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी.
३) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी।
उत्प्रेक्षा
उपमेय हे जणू उपमानच आहे, असे दर्शविण्यासाठी जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतो.
१) हा आंबा जणू साखरच!
२) त्याचे अक्षर जणूकाय मोतीच!
३) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
४) आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!
५) वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे!
मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे!
अपन्हुती
अपन्हुतीचा अर्थ लपविणे असा होतो. यात उपमेयं लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.
१) हा आंबा नाही, ही साखरच आहे. (उपमेय – मूळ वस्तू, उपमान-उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू)
२) हे हृदय नसे, परि स्थंडील धगधगते।
३) ओठ कशाचे? देठचि फुलले पारिजातकाचे।
अनन्वय
ज्या वेळी उपमेयची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ते उपमेय बरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो
१) आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्यापरी।
२) झाले बहु, होतील: बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा।
रूपक अलंकार
जेव्हा उपमेय आणि उपमान यांत भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार
१) तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे।
२) देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर
३) ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा ।। दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी ।।
अतिशयोक्ती
एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगणे त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात.
१) जो अंबरी उफाळता कल्पना खुर लागलाहे आहे तो चंद्रमा निज तनूवरि डागलाहे.
२) ती रडली समुद्रच्या समुद्र.
३) तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.
दृष्टांत
एखादा विषय पटवून सांगण्या साठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो
१) लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी मारअंकुशाचा मार ।
२) निवडी वेगळे क्षीर आणि पाणी। राजहंस दोन्ही वेगळाली
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। येरागबाळाचे काम नोहे
३) न कळता पद अग्नीवरी पडे। न करि दाह असे न कधी घडे।
अजित नाम वदो भलत्या मिसे। सकळ पातक भस्म करीतसे ।।
विरोधाभास
वरकरणी विरोध पण वास्तविक विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
१) जरी आंधळी मी तुला पाहते.
२) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
चेतनागुणोक्ती
निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतनागुणोक्ती अलंकार होतो.
१) कुटुंब वत्सल इथे फणस हा। कटिखांद्यावर घेऊन बाळे
२) चाफा बोलेना, चाफा चालेना। चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।।
३) डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशी वरुनी;
४) धक्क्यावरच्या अजून बोटी
साखरझोपेमधी फिरंगी
अर्थान्तरन्यास
एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थान्तरन्यास अलंकार होतो.
१) कठीण समय येता कोण कामास येतो?
२) अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा।
३) फूल गळे, फळ गोड जाहले बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे का? मरीण अमरता ही न खरी।
स्वभावोक्ती
जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब; पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात.
१) अंग वक्र, अधरि धरी पावा गोपवेष हरि तोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा.
२) चिमुकली पगडी झळके शिरी चिमुकली तलवार धरे करी,
चिमुकला चढवी वर चोळणा चिमुकला सरदार निघे रणा ।।
३) मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक.
व्याजस्तुती
बाहेरून स्तुती; पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा; पण आतून स्तुती असेल तर व्याजस्तुती अलंकार होतो.
१) होती वदन-चंद्राच्या दर्शनाचीच आस ती।
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती? ।।
पर्यायोक्ती
एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्षरीतीने सांगणे याला पर्यायोक्ती म्हणतात.
१) तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस. (अशक्य गोष्ट)
२) तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. (तुरुंगात)
सार
वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो, तेव्हा सार हा अंलकार होतो.
१) विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीती विना गती गेली ॥
गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
२) आधिच मर्कट तशातही मद्य प्याला
झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला
अन्योक्ती
दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती ज्याच्या बद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती .
१) सांबाच्या पिंडीते बसशी खेटूनी वृश्चिका आज
परि तो आश्रय सुटता खेटर उतरील रे तुझा माज़
२) येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यासि किमपीहि नसे विवेक रंगावरून तुजला म्हणतील काक
ससंदेह
उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते, त्या वेळी ससंदेह अलंकार होते
१) हा दोरखंड की साप?
२) कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा चंद्र कोणता वदन कोणते
भ्रान्तिमान
उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे भ्रान्तिमान अलंकार होतो.
१) पलाशपुष्प मानोनि शुकचंचू मध्ये अलि
तोही जांभूळ मानोनी, त्यास चोचीमध्ये धरी ।।
२) भृगे विराजित नवी अरविंदपत्रे। पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे ।।
घालीन अंजन अशा मतिने तटाकी। कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ।।
व्यतिरेक
उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते.
१) अमृताहूनि गोड नाम तुझे देवा.
२) कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान.
३) तू माउलीहून मवाळ। चंद्राहूनही शीतल। पाणियाहूनही पातळ। कल्लोळ प्रेमाचा ।।
४) चंद्राची युवतीमुखास उपमा देती कशाला कवी, हे पूर्वी न मला रहस्य कळले,
चित्रातले हे मुख पाहूनी मजला अपूर्णचि गमे,
चंद्रास हे लाजवी की याच्यावर निष्कलंक विहरे बुद्धसवे कौतुके.